व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा
वैजापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका व्यापाऱ्याचा सायबर आर्थिक फसवणुकीच्या गंभीर प्रकरणात सहभाग निष्पन्न झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सायबर गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान संबंधित व्यापाऱ्याच्या बँक खात्यात देशातील विविध राज्यांमधील सायबर फसवणुकीतून लुटलेली रक्कम जमा झाल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश सुरेश सवई (३०, ह. मु. एसएस अॅग्रो भगूर फाटा, वैजापूर, मूळ रा. महांकाळ वाडगाव, ता श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे. योगेश सवई याची चोरवाघलगाव शिवारात एस.एस. अॅग्रो नावाचे फर्म आहे.
सायबर गुन्हे शाखेला विविध राज्यांतील ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींचा तपास करताना योगेशच्या नावावर संशयास्पद बँक व्यवहार आढळले. त्याच्या बंधन बँकेच्या करंट खात्यावर अनेक राज्यांतील फसवणुकीच्या रकमांचे व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले.
२५ जून ते १९ जुलै या कालावधीत हे व्यवहार झाले. तपास यंत्रणांनी संबंधित खात्याचे व्यवहार, आर्थिक देवाण -घेवाण तसेच इतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली. व्यापाऱ्याने जाणूनबुजून या व्यवहारांमध्ये सहभाग घेतला होता, की त्याचे खाते इतरांनी वापरले, याचाही तपास सुरू आहे. आवश्यक पुरावे संकलित केल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












